ठाणे- भिवंडीसह राज्यातील छोट्या महापालिकांसह एकंदरीतच राज्यातील आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे राज्य शासनाने विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत केले. भिवंडी शहरातील वाढत्या कोरोना रुग्णासंख्येमुळे येथील शासकीय व आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी रविवारी देवेंद्र फडणवीस भिवंडीत आले होते. यावेळी त्यांनी शहरातील कोविड रुग्णालय असलेल्या स्व. इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली व येथील परिस्थिती सुधारण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या.
फडणवीस यांनी भिवंडी महापालिकेच्या कारभाराचा धावता आढावा घेतला व शहरातील वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सूचना दिल्या. ग्रामीण भागातील कोविड रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे देखील लक्ष देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना केल्या असून ग्रामीण भागापेक्षा शहरात दाटीवाटी अधिक असल्याने व शहरातील रुग्णासंख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील परिस्थिती सुधारण्याकडे त्यांनी यावेळी जास्त लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या.
त्याचबरोबर राज्यातील छोट्या महानगरपालिका व नगरपंचायतींकडे राज्यशासनाने विशेष लक्ष द्यावे व याठिकाणी शासनामार्फत निधी व सोयी सुविधा पोहोचविण्याची आवश्यकता असून याकडे सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर पोलिसांचे वेतन कपात व आरोग्य यंत्रणांना सोयी सुविधांचा प्रश्न उपस्थित होत असताना राज्य सरकारने खरेदी केलेल्या नव्या व महागड्या गाड्यांबद्दल पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता आधी राज्य सरकारने पोलीस व आरोग्य यंत्रणेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगून ठाकरे सरकारला चिमटा काढला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा सुरू होण्याच्या एक तास आधीच भिवंडी शहरात देवेंद्र फडणवीस दाखल झाल्याने प्रशासकीय यंत्रनेसह महानगरपालिका प्रतिनिधी यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान फडणवीस यांनी महानगरपालिका मुख्यालयात दाखल होऊन आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्याकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीस आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, उपमहापौर इम्रान खान, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, सभागृह नेता विलास पाटील उपस्थित होत, त्यांनी चर्चेत सहभाग घेतला.