सातारा - फलटण तालुक्यातील निंबळक येथील पुरातन निमजाई मंदिरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. देवीचे चांदीचे मखर (महिरप) गळ्यातील मंगळसूत्र व नथ असा सुमारे ३ लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
मंदिरातील गाभाऱ्यात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा चोरीचा प्रकार कैद झाला आहे. यातील फुटेजवरून पोलिसांनी संशयितांचा तपास सुरू केला आहे. याबद्दल मंदिराचे पुजारी शिवसागर गुरव यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.
मंदिराचे मुख्य विश्वस्त राम निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थ व भक्त मंडळींच्या सहकार्याने या पुरातन मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार केला असून मंदिराच्या मुख्य इमारतीसह परिसर सुशोभित करण्यात आला आहे. निमजाई देवीच्या मुख्य गाभाऱ्यात देवी मातेच्या मूर्तीच्या बाजूने सुमारे २ किलो चांदीची मखर (महिरप) तयार करुन बसविण्यात आली होती. तर देवीच्या गळ्यात अंदाजे १ तोळा वजनाचे सोन्याचे गंठण, सोन्याची नथ होती. हा सर्व ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे.
कशी केली चोरी -
मंदिरातील मुख्य गाभाऱ्याला असलेले कुलूप काढता न आल्याने चोरट्यांनी कटावणीने कोयंडा तोडून, आत प्रवेश केला. नंतर कटावणीनेच चांदीचे मखर (महिरप) काढून नेताना दोघे इसम मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेने सीसीटीव्ही मधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून संशयितांना ओळ्खणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे दिसत असले तरी या प्रकारात किमान ३ ते ४ जण सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या मंदिरापासून जवळ असलेल्या निंबळक गावच्या हद्दीतील वडाचा मळा शिवारात देवीच्या मखराचे पाठीमागे लावलेले लाकडी आवरण एका झाडाखाली काढून टाकल्याचे आढळून आले. या प्रकरणी आता अधिक तपास बरड पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिक तपास संजय बोंबले करीत आहेत.