रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी आणखी 13 नव्या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 431 झाली आहे.
गेल्या काही दिवस जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. एप्रिल महिन्याच्या शेवटी 5 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्ण संख्या शून्यावर आली होती. मात्र, 2 मे पासून जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या दीड महिन्यात ही संख्या सव्वा चारशेने वाढल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण संख्या 431 वर जावून पोहचली आहे.
दरम्यान, आणखी 10 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या 301 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 17 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. सध्या अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांची संख्या 113 एवढी आहे.