कोल्हापूर : चाऱ्याच्या शोधात असणारा गवा मध्यरात्री विहिरीत पडला. ही बाब वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने या गव्याला जिवंत बाहेर काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा जवळील शिरसंगी येथे हा प्रकार घडला. गव्याला बाहेर काढल्यानंतर हा गवा जंगलाच्या दिशेने रवाना झाला.
अनेक अडचणी
आजरा तालुक्यातील शिरसंगी येथील मुकुंद देसाई यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत काल (10 एप्रिल) रात्री गवा पडला होता. ही बाब आज सकाळी स्थानिक गावकऱ्यांच्या निदर्शनास आली. चाऱ्याच्या शोधात गवा गावाशेजारी आल्याचे बोलले जात आहे. या नंतर गावकऱ्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळविली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. विहिर खोल असल्याने गव्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.
गव्यासाठी मातीने बुजवली विहीर
त्यानंतर वन विभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या सह्याने विहिरीच्या बाजूला खोदकाम केले. विहिरीत माती व पाणी सोडून ही विहीर पूर्ण बुजवण्यात आली. त्यानंतर गव्यास सुखरुप बाहेर काढण्यात आले. गवा बाहेर येताच त्याने जंगलाच्या दिशेने धाव घेतली