हैदरबाद - सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियमसन याच्या आजीचे निधन झाल्याने तो मायदेशी परतला आहे. त्यामुळे तो मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो सहभागी होणार नाही. केन विलियमसन शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
विलियमसनच्या गैरहजरीत भुवनेश्वर कुमार संघाची धुरा सांभाळणार आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यापूर्वी ५ सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. मागील सीजनमधील रनर्स अप हैरदाबादच्या संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली सुरुवात करत सुरुवातीच्या ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळविला होता. त्यानंतर सलग ३ सामन्यात त्यांचा पराभव झाला.
सध्या हैदराबादच्या संघाने ९ सामन्यात ५ विजय मिळवत गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. केनऐवजी आजच्या सामन्यात मोहम्मद नबी आणि शाकिब अल हसन यांना संधी मिळू शकते. दुसरीकडे जॉनी बेयरस्टो हा आयपीलमधील शेवटचा सामना खेळत आहे. यानंतर तो राष्ट्रीय संघात सामील होण्यासाठी इंग्लंडला रवाना होईल. बेयरस्टो इंग्लंडमध्ये पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेच्या तयारीसाठी उद्या रवाना होणार आहे.