जयपूर (राजस्थान) - राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी काँग्रेस नेते सचिन पायलट यांना समर्थन करणारे आमदार संजय जैन यांना अटक केली. जैन हे राजस्थान सरकार अल्पमतात आणत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. दोन दिवसांपूर्वी 3 जणांमध्ये सरकार पाडण्यासंबंधी संभाषण होत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये जैन बोलत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती अतिरीक्त पोलीस महासंचालक अशोक राठोड यांनी दिली.
आमदार जैन हे दुसऱ्या व्यक्तीसोबत घोडे बाजारसंबंधी बोलत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची गुरुवारी आणि शुक्रवारी चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
काँग्रेसचे प्रतोद महेश जोशी यांनी आमदार जैन, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. हे तिघेही राजस्थान सरकार पाडण्याच्या आणि आमदार खरेदी करण्याची गोष्ट करत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी संबंधितांवर कलम 124 (अ) राजद्रोह आणि 120 (ब) कट, असे दोन गुन्हे दाखल केले आहेत.