मुंबई - बीडीडी चाळीचा पुनर्विकास संथ गतीने सुरू असून अनेक रहिवाशांचा पुनर्विकासाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर रहिवासी संघटनेने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आपल्या सर्व समस्या त्यांनी मांडल्या. तर पवार यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे तसेच रहिवाशांना विश्वासात घेऊनच प्रकल्प मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनाचा एकत्रित संघचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी दिली आहेत.
नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी येथील चाळींचा पुनर्विकास म्हाडा करत आहे. मात्र या पुनर्विकासाला काही संघटना आणि रहिवाशांचा विरोध आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास प्रकरणी येथील रहिवाशांच्या बऱ्याच मागण्या त्या मान्य झाल्याशिवाय पुनर्विकास मार्गी लावू देणार नसल्याची भूमिका रहिवाशांनी घेतली आहे. पुनर्विकासात बऱ्याच जाचक अटी घालण्यात आल्याचा रहिवाशांनी आरोप केला आहे. यातील पहिली अट म्हणजे पुनर्विकासासाठी रहिवाशांच्या संमतीची गरज नाही. तर दुसरी जाचक अट म्हणजे रहिवाशांबरोबर कायमस्वरुपी करार करण्याची गरज नाही. यासोबत काही जाचक अटी असून त्यामुळे रहिवासी या प्रकल्पाला विरोध करत आहे.
मात्र असे असतानाही राज्य सरकार आणि म्हाडा हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे. अशातच आता म्हाडाने रहिवाशांचा विरोध असताना देखील पात्रता निश्चिती करण्याचा कामाला सुरुवात केली आहे. तर 9 ऑक्टोबरला म्हाडात स्थानिक खासदार आणि आमदार यांच्याबरोबर एक बैठक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनाचा एकत्रित संघचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी थेट पवारांपुढे आपल्या समस्या मांडल्या आहेत. तर पवारांनीही या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. तेव्हा आता या प्रकल्पात पवार लक्ष घालणार असल्याने पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.