आष्ठी (बीड) : ज्या गावात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. त्याच गावात कोरोना सेंटर उभारून गंभीर रुग्णांना आष्टीत दाखल केले जाते. ज्या कोरोना रूग्णांना काही लक्षणे नाहीत त्यांना गावातीलच कोरोना सेंटरमध्ये ठेवण्यात यावे. म्हणून प्रत्येक गावात कोरोना सेंटर उभारा. त्यामुळे कोरोनाची शहरातील जत्रा बंद होईल, अशा सुचना आमदार सुरेश धस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
कामाची पद्धत बदला
आष्टी येथील आमदार सुरेश धस यांनी तहसिल कार्यालयात तालुक्यातील मुख्य अधिकाऱ्यांची बैठक आज रविवार (11 एप्रिल) सकाळी साडेअकरा वाजता घेतली. या बैठकीत तहसिलदार राजाभाऊ कदम, नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.राहूल टेकाडे, सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता जर्वेकर, मुख्याधिकारी निता अंधारे, के.टी.सांवत, प्रकाश हळकर आष्टी शहराचे उपनगराध्यक्ष सुनिल रेडेकर यांच्यासह आदि उपस्थित होते. यावेळी सुरेश धस म्हणाले, की तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटानुसार कोरोना सेंटर उभारून ज्या गावात कोरोना बाधीतांची संख्या जास्त आहे. त्या गावातच रूग्ण ठेऊन त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. होम आयसोलेशनमुळे रुग्ण गांभिर्य घेत नाहीत. त्यामुळे कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या ज्या पध्दतीने काम सुरू आहे. तसे वर्षभर जरी राहिले तर कधीच रुग्ण कमी होणार नाहीत. सध्या आरोग्य विभागाने कामाची पध्दत बदलने गरजेचे असल्याच्या सूचना धस यांनी दिल्या.
अगोदर कर्मचाऱ्यांची काळजी घ्या
जे कर्मचारी कोरोना सेंटरमध्ये काम करीत आहेत. त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने हँडग्लोज, मास्क व पीपीकीट असणे गरजेचे आहे. जर आरोग्य विभागाच्या साफसफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवले तरच कोरोना नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे अगोदर आरोग्य कर्मचाऱ्यांची काळजी घ्या , असे आष्ठीचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी यावेळी म्हटले.
सोनवणे हॉस्पिटलला कोरोना सेंटरची परवानगी कोणी दिली?
शहरातील मध्यवती भागात असलेल्या सोनवणे हाॅस्पीटलला कोरोना सेंटरची परवानगी कोणी दिले? असे आमदार धस यांनी वैद्यकीय अधिक्षक व तहसिलदार यांना विचारले. यावर, आम्ही परवानगीच दिली नसल्याचे प्रशासानाने सांगितले. मग त्यांना कोणीच परवानगी दिली नसेल तर ते पंधरा सोळा स्कोर असलेले कोरोना बाधित रूग्ण उपचारासाठी रूग्णालयात ठेवतात. त्यामुळे ही परिस्थिथी गंभीर आहे, असे धस म्हणाले.
कामात हयगय केल्यास…
ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. राहूल टेकाडे हे काम कमी पण कोरोना रूग्ण वाढीसाठी अजिबात प्रयत्न करीत नाहीत. आष्टीच्या कोरोना सेंटरमध्ये रूग्णांना सतरंजी सुध्दा नशीबात नाही. जर तुम्हाला हे चालविता येत नसेल तर आम्ही हे चालवू. पण जर अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही आ.धस यांनी दिला.