लखनऊ (उत्तर प्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा, स्वातंत्र्यदिन आणि आगामी महोत्सवापूर्वी नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश पोलीस आणि सशस्त्र सीमा बल यांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. गोरखपूर झोनचे अतिरिक्त महासंचालक दावा शेर्पा यांनी ही माहिती दिली.
‘महाराजगंज, सिद्धार्थनगर, श्रावस्ती आणि बहराइच या भागात सीमेवरील दलांनी अतिरिक्त दक्षता घेतली आहे. खुल्या सीमेवरून आणि इतर लहानसहान मार्गांनी येणाऱ्या लोकांना प्रवेश करण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. यासाठी सर्व या सुरक्षा दलांना नेमले आहे,’ असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी 5 ऑगस्टला राम मंदिराच्या शिलान्यास सोहळ्यासाठी अयोध्या दौर्यावर येणार आहेत. यासाठी मुख्य रस्त्यांव्यतिरिक्त एसएसबीच्या चौक्यांवर कॅमेरे लावण्यात आले आहेत.
‘श्वानपथक आणि महिला शाखेची एक पलटणही तैनात करण्यात आली आहे. भारत-नेपाळ सीमेवरील (महाराजगंजमध्ये) सोनौली आणि तुतीबारी चौकीवर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत,’ असे शेर्पा म्हणाले.
इंडो-नेपाळ सीमा पोलीस, स्थानिक गुप्तहेर शाखा आणि इतर गुप्तचर यंत्रणा यासारख्या इतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हॉटेल्स, रेल्वे आणि बस स्थानकांसारख्या सार्वजनिक ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे, असे शेर्पा यांनी सांगितले. नेपाळला लागून असलेली सच्छिद्र सीमा (छुप्या रीतीने प्रवेश करता येण्याजोगी) सुरक्षा दलांसाठी एक मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.