अमरावती - कोरोना संकट काळात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना आंध्रप्रदेश सरकारने आर्थिक मदत केली आहे. 2 लाख 62 हजार वाहनचालकांना प्रत्येकी 10 हजार रुपये मदत राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत देण्यात आली आहे. सरकार रिक्षा आणि ऑटो चालकांना वार्षीक 10 हजार रुपये या योजनेअंतर्गत देते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने चार महिने आगाऊ ही मदत देण्याचे जाहीर केले आहे.
'वायएसआर वाहन मित्र' योजना
'वायएसआर वाहन मित्र' योजनेअंतर्गत 2 लाख 62 हजार 493 लाभार्थ्यांना 262 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री वाय एस आर जगन मोहन रेड्डी यांनी जाहीर केले. जिल्ह्याधिकाऱ्यांशी झालेल्या डिजिटल कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
हस्तांतरीत करण्यात येणार रक्कम दारुसाठी नाही तर योग्य कामासाठी वापरण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी वाहनचालकांना केले. हे प्रवासी आणि चालक दोघांच्याही धोक्याचे असल्याचे ते म्हणाले. वायएसआर वाहन मित्र ही योजना 4 ऑक्टोबर 2019 साली सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांना विमा हफ्ता भरण्यासाठी, परवाना शुल्क आणि इतर खर्चासाठी सरकारकडून दरवर्षी दहा हजार रुपये देण्यात येतात.
मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून कोरोनामुळे वाहनचालकांना काम नाही. त्यामुळे या योजनेंतर्गत देण्यात येणारी मदत चार महिने आधीच देण्यात येत आहे. ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम आधीच्या कोणत्याही व्यवहाराची थकीत म्हणून बँक जवावट करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.