मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगल समोर आला आहे. याप्रकरणी सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी समन्स बजावले होते. आज तिला पुन्हा चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले असून तिची चौकशी सुरू झाली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतने काही दिवसांपूर्वी त्याच्या वांद्रेतील घरात आत्महत्या केली होती. मात्र, त्याने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात पाटना येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली जात होती. शेवटी न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे पोहोचवले. तेव्हापासून सीबीआयची चौकशी सुरू आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, तिचे वडील, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यासह अनेकांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ड्रग्स अँगल समोर आला. त्यामुळे एनसीबी त्याचा तपास करत आहे. यापूर्वी एनसीबीने रियाचा भाऊ शोविक आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर मिरांडाला अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी दिली आहे. आता रियाची चौकशी सुरू असून तिलाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.