हिंगोली - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराची घटना ही खरोखरच माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे सांगत आज
हिंगोली येथे रिपब्लिकन सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी यूपी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देत उत्तर प्रदेश सरकार अन तेथील पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
हाथरस येथील अत्याचाराची घटना ही अत्यंत लाजिरवाणी आहे, या घटनेमुळे महिला ह्या खरोखरच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पीडितेवर बलात्कार करून, पुरावा नष्ट करण्यासाठी रातोरात तिच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. या सर्व प्रकाराने एकट्या राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची मान शरमेने झुकली आहे. एवढी विदारक परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील, तेथील सरकार व पोलीस प्रशासन पीडितेच्या कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आला.
तर, त्या पीडितेच्या कुटुंबाची भेट जाणाऱ्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांसोबत तेथील पोलीस प्रशासनाने हाणामारी केली आहे. या घटनेचाही निषेध करत पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय देण्यात यावा अन् बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने केली.
यावेळी, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण घोंगडे, राहुल पुंडगे, विकी काशीदे, नितीन खिल्लारे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.