माढा (सोलापूर)- विठ्ठला, सरकारला दूध दरवाढ करून शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची सुबुद्धी दे रे, असे साकडे घालत माढा तहसील कार्यालय समोर माढा तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. रासपाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.
रासपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी श्री विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून दुध दरवाढीची मागणी केली व लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास एकाही महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याला फिरकू देणार नसल्याचा इशारा देत, ठोकशाही पद्धतीने गनीमी काव्याने या पुढे रासप आदोलन करणार असल्याची भुमिका माऊली सलगर यांनी यावेळी स्पष्ट केली.
यावेळी शासनाने दुधाच्या दरात वाढ करून 35 रुपये दर देऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना 10 रुपये अनुदान द्यावे, ही मागणी करण्यात आली. सरकार आणि प्रशासनाच्या दरबारांचे उंबरठे झिजवत निवेदने देऊन आम्ही थकलो रे आता." बा विठ्ठला तूच मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकारला दुध दरवाढ करण्याची सुबुध्दी दे रे बाबा. अशी आर्त हाक देत व घोषणाबाजी देत झालेल्या या आंदोलनाने तहसील परिसर दणाणून सोडला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप गडदे, तालुका अध्यक्ष गोरख वाकडे यांच्यासह रासपाचे कार्यकर्तै शेतकरी उपस्थित होते.