सोलापूर- सोलापुरात कोरोनाने कहर केला आहे. रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी आता महापालिका प्रशासनाकडून घरोघरी जाऊन रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. घरोघरी जाऊन चाचणी केली जात असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढत आहे.
सोलापुरात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक आहे. या परिस्थितीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना इतर नागरिकांपासून वेगळे ठेवणे खूप गरजेचे आहे. मात्र ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे, मात्र कोणतीही लक्षणे नाहीत, अशा कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अशा कोरोनाबाधितांमुळे इतरांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे अशा कोरोनाबाधित व्यक्तींना तातडीने शोधून त्यांचे अलगीकरण करण्याचे कार्य पालिकेने घेतले आहे. त्यानुसार सोलापूर महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. शहरात 30 पथकांच्या माध्यमातून ही टेस्ट करण्यात येत आहे.
रॅपिड अँटिजेन टेस्टमुळे लवकरात लवकर कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सामान्य व्यक्तींमधून कोरोनाबाधित व्यक्ती वेगळे करण्यास मदत होत आहे. आज सकाळी पालिकेच्या वतीने धरमसी लाईन तसेच शहरातील इतर भागात रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.