जळगाव - विनातिकिटे प्रवास करणारे, सवलतीचा गैरवापर करणारे ज्येष्ठ नागरिक यांच्यामुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसतो. हे प्रकार रोखण्यासाठी आज जळगावमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी ६० अनियमित प्रवाशांकडून ६४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. भुसावळ ते नाशिक दरम्यान दोन रेल्वेगाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय. डी. पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी. अरुणकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिममध्ये एकूण ६० अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे. या दरम्यान, ११ तिकीट तपासणी कर्मचारी आणि ४ आरपीएफ कर्मचारी यांनी प्रवाशांकडून एकूण ६४ हजार २३५ रूपये दंड वसूल केला. या मोहिमेमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५४ जणांकडून ५० हजार १८० रुपयांचा दंड वसूल केला. तर, तिकिटांची बदली करणाऱ्या प्रवाशाकडून ३ हजार २५५ रुपयाचा दंड वसूल केला. ज्येष्ठ नागरिक कोट्याचा गैरवापर करणाऱ्या आठ जणांकडून १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच प्रवाशांनी योग्य तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने यावेळी केले.