मुंबई - अभिनेता ऋषी कपूर बऱ्याच काळापासून अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना नेमका कोणता आजार झालाय ही बाब अद्यापही अस्पष्ट आहे. परंतु त्यांना कोणता आजार होता, आणि उपचार कुठवर आलेत याचा खुलासा बॉलिवूड दिग्दर्शक राहुल रावेल यांनी सोशल मीडियावर केला आहे. त्यांनी ऋषी कपूरसोबतचा फोटो शेअर केलाय. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''ऋषी कपूर ( चिंटू ) आता कॅन्सर मुक्त झाले आहेत.'' त्यांची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली आहे.
ऋषी कपूर यांचा भाऊ रणधीर कपूर यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. ऋषी कपूर लवकरच भारतात परत येतील असे त्यांनी म्हटलंय. त्यांनी लिहिलंय, ''त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते कॅन्सरपासून पूर्णतः मुक्त झाले आहेत. त्यांना परत येण्यास अजून वेळ लागेल, कारण उपचार संपलेले नाहीत. ते आगामी काही महिन्यात इथे येतील.''
कपूर परिवाराने पहिल्यांदाच ऋषी कपूर यांच्या कॅन्सरबाबत विधान केले आहे. नीतू कपूर यांनी नवीन वर्षात केलेल्या ट्विटमध्ये कॅन्सरचा ओझरता उल्लेख केला होता.
ऋषी कपूर सप्टेंबर २०१८ मध्ये उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले. ऑक्टोबरमध्ये त्यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला ऋषी कपूर हजर राहू शकले नव्हते.