पुणे - शहरात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना शहरात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची मोठी कमतरता भासत आहेत. अनेक रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडसाठी वणवण भटकत असल्याचे चित्र आहे.
शहराची ही स्थिती असताना आता मिशन वायू अंतर्गत सिंगापूर येथून पुण्यासाठी 250 व्हेंटिलेटर आणि 4 हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची पूर्तता करण्यात येत आहे. ज्या रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त आहे त्या रुग्णालयांना ही साधने पुरवली जाणार आहेत. सिंगापूरहुन ही साधने भारतात इतर ठिकाणी ही पाठवली जाणार असून याचे पहिले पार्सल 25 तारखेला सोमवारी येण्याची शक्यता आहे.
पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी ही माहिती दिली. उद्योग क्षेत्राकडून अशा प्रकारचा पुढाकार घेण्यात आला असून उद्योग क्षेत्राकडून आरोग्यक्षेत्राला एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत असल्याचे मेहता यांनी सांगितले.
शहरातील वाढत असलेल्या या संकटाशी सामना करण्यासाठी उद्योग जगत पुढे आले असून पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स (ppcr) हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. सरकार, उद्योग सामाजिक संस्था आणि आरोग्य यंत्रणा अशा सर्वाचा या मदतीसाठी पुढाकार असून, गेल्या काही दिवसात या योजनेअंतर्गत 10 ते 12 कोटींचा निधी उभारून विविध रुग्णालयामध्ये 12 ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत, असेदेखील सांगण्यात आले.