नांदेड- उमरी येथील एक साधू व सेवकाच्या हत्येच्या घटनेने देशभर खळबळ माजली होती. या घटनेपूर्वी दोन प्रकरणात आरोपीवर कारवाई न करता त्याला सोडून दिल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांना निलंबित करण्यात आले आहे.
उमरीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणा येथील मठाधिपती बालतपस्वी निर्वादरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज व इतर एकाच्या हत्येची घटना मे महिन्यात घडली होती. या प्रकरणातील आरोपी साईनाथ लिंगाडे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून त्यास तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली होती. दोघांची हत्या करण्याच्या काही दिवसापूर्वी आरोपी साईनाथ लिंगाडे याने गावातील मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी उमरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु, आरोपीस पोलीस ठाण्यात बोलावून, माफी मागवून हे प्रकरण सोडविण्यात आले होते.
त्यानंतर गावात कुर्हाड घेऊन फिरत असल्याचे गावकर्यांनी उमरी पोलिसांना कळविले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अशा वेगवेगळ्या चौकशी प्रकारात उमरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अनंत्रे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहे.