रत्नागिरी- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर तसेच पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना आज राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथे घडली. हल्ल्यात पोलीस वाहनाच्या काचा फोडल्याचे देखील समोर आले आहे.
साखरीनाटे येथे सोमवारी (22 जुलै) 2 कोरोना रुग्ण सापडले होते. यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज आणखी एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य पथक रुग्णवाहिका घेऊन गावात गेले होते, तसेच सर्वेक्षणासाठीही आरोग्य कर्मचारी गावात गेले होते, मात्र तेथील जमावाने कर्मचाऱ्यांना गावात येण्यास विरोध केला. त्यामुळे पोलिसांना बोलविण्यात आले. मात्र जमावाने आरोग्य कर्मचारी व पोलिसांवरच हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
यावेळी शासकीय वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये वाहनांच्या काचाही फुटल्या आहेत. तसेच एक आरोग्य कर्मचाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.