पेशावर - वायव्य पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एका पाकिस्तानी मुस्लीम तरुणाने बुधवारी न्यायालयात घुसून धर्मनिंदा केल्याचा खटला सुरू असलेल्या एका मुस्लिमाला गोळ्या घालून ठार केले. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. खालिद खान असे या हल्लेखोराचे नाव असून त्याला अटक केली आहे. मात्र, न्यायालयात इतक्या कडक सुरक्षा व्यवस्थेत तो कसा गेला, हे लगेच लक्षात आले नाही.
पोलीस अधिकारी अझमत खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, खटला चालू असलेल्या ताहिर शमीम अहमद याने इस्लामचा संदेष्टा असल्याचा दावा केला होता. दोन वर्षांपूर्वी त्याला ईश्वरनिंदा करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. रुग्णालयात नेण्यापूर्वीच अहमदचा मृत्यू झाला.
धर्मनिंदा हा पाकिस्तानमधील एक अत्यंत वादग्रस्त विषय आहे. येथे या गुन्ह्यात दोषी लोकांना जन्मठेपेची शिक्षा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. परंतु, पाकिस्तानमधील लोकांचे जमाव आणि लोक वैयक्तिकरित्याही अनेकदा कायदा आपल्या हातात घेतात.
ईश्वरनिंदा केल्याबद्दल संबंधितांना अद्याप फाशीची शिक्षा ठोठावली नसली तरी, केवळ आरोप केल्यामुळे दंगल होऊ शकते. असे निंदनीय आरोप अनेकदा धार्मिक अल्पसंख्याकांना धमकावण्यासाठी आणि वैयक्तिक वैमनस्य काढण्यासाठी वापरले गेले आहेत, असे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार गटांचे म्हणणे आहे.
२०११ मध्ये ईश्वरनिंदा केल्याचा आरोप असलेली एका ख्रिश्चन महिला आसिया बीबी हिचा बचाव केल्यावर पाकमधील पंजाबच्या एका राज्यपालाला त्याच्या सुरक्षा रक्षकानेचे ठार मारले होते. ही महिला आठ वर्षे मृत्यूदंडाच्या छायेत राहिल्यानंतर ती निर्दोष सुटली. यानंतर या प्रकरणात आंतरराष्ट्रीय मीडियाचे लक्ष वेधले. तिच्या सुटकेनंतर इस्लामिक अतिरेक्यांनी तिला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. याचा सामना करत ती गेल्या वर्षी कॅनडाला तिच्या मुलींकडे गेली.