कराची - नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानचा ४-० फरकाने दारून पराभव झाला. त्यानंतर पाकच्या विश्वकरंडक संघात काही तडकाफडकी बदल करण्यात आले. अष्टपैलू फहीम अशरफ आणि वेगवान गोलंदाज जुनैद खान यांना संघाबाहेर ठेवले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या जुनैदने तोंडावर काळी पट्टी बांधून निवड समितीचा निषेध व्यक्त केला.
जुनैद खानला विश्वकरंडक संघात सुरुवातीला स्थान देण्यात आले. त्यानंतर त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यामुळे त्याच्या शैलीत निषेध व्यक्त केला. तोंडावर काळी पट्टी बांधलेला फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले आहे, की मी काही बोलणार नाही. सत्य हे नेहमी कटू असते.
जुनैदने त्याच्या करिअरमध्ये ७६ सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले. यामध्ये २९.२३ च्या सरासरीने ११० बळी घेतले आहेत. जुनेदच्या जागी वहाब रियाजला संधी दिली आहे. त्याने त्याचा शेवटचा सामना २०१७ साली भारताविरुद्धच्या चॅम्पियंस ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळला होता. यात त्याला ८७ धावा देत एकही गडी बाद करता आला नाही.
बोर्डाने डाव्या हाताने गोलंदाजी करणारा मोहम्मद आमिर आणि वहाब रियाज यांना संघात स्थान दिले आहे. युवा फलंदाज आबिद अलीला आसिफ अलीच्या जागेवर संघात स्थान देण्यात आले आहे.