विशाखापट्टणम - आपयीएलच्या १२ व्या मोसमात दुसरा क्वॉलिफायर सामना आज चेन्नई आणि दिल्ली यांच्यात रंगणार आहे. या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा पाऊस पाडणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला ऑरेंज कॅप मिळणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. तर पर्पल कॅपसाठी सर्वाधिक विकेट घेण्यात कंगिसो रबाडाला इम्रान ताहिर आव्हान देऊ शकतो.
डेव्हिड वॉर्नर विश्व करंडकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला आहे. मायदेशी परण्यापूर्वी त्याने १२ सामन्यात एक शतक आणि आठ अर्धशतकांसह ६९२ धावा केल्या आहेत. रबाडाने १२ सामन्यात २५ बळी घेतले आहेत, तर इम्रान ताहिरने १५ सामन्यात २३ गडी बाद केलेत.
वॉर्नरनंतर सर्वाधिक धावा लोकेश राहुल याने केल्या आहेत. त्याने १४ सामन्यात ५९३ धावा केल्या आहेत. त्याचा संघ प्ले ऑफमध्ये पोहचू शकला नाही. त्यानंतर आंद्रे रसेल याने केकेआरकडून खेळताना ५१० धावा केल्या आहेत. त्याचाही संघ प्लेऑफमध्ये इन्ट्री करु शकला नाही. दिल्लीच्या शिखर धवनने १५ सामन्यात ५०३ धावा केल्या आहेत. त्याला वॉर्नरला पाठीमागे टाकण्यासाठी उर्वरित सामन्यांत २ शतके ठोकावी लागतील.
आयपीएलमध्ये सर्वाधिक २५ बळी कंगिसो रबाडाने घेतले आहेत, तर इम्रान ताहिरने २३ बळी घेतले आहे. दोघांमध्ये २ बळींचे अंतर आहे. ताहिरला आज रबाडाला पाठीमागे टाकण्याची संधी आहे. सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असलेला राजस्थानचा श्रेयस गोपलने २० गडी बाद केले आहेत. तर खलील अहमद आणि मोहम्मद शमी यांच्या नावावर १९ बळीची नोंद आहे.