मुंबई- गेल्या काही वर्षात महिलांमध्ये, त्यातही ग्रामीण भागातील महिलांमध्ये गर्भाशयाचा आणि स्तनाच्या कॅन्सरचा आजार बळावतो आहे. त्यात वेळेत निदान होणे अत्यंत आवश्यक असते. पण या चाचण्यांची सोय गावात नसते. त्यामुळे वेळेत निदान न झाल्याने आजार वाढल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या मदतीसाठी 'ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर' ही संस्था पुढे सरसावली आहे. या संस्थेकडून 8 वर्षात २ हजार ५०० हून अधिक गावातील हजारो महिलांची तापणसी करून निदान करत त्यांना पुढील उपचारासाठी आवश्यक तो सल्ला देण्यात येणार आहे.
स्तनाच्या कॅन्सरचा विचार करता भारत अशा रुग्णांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे. तर गर्भाशयाच्या कॅन्सरच्या आजारात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या आजाराला आळा घालणे हे भारताच्या आरोग्य यंत्रणेपुढील मोठे आणि कठीण आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी 'ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर’ सारख्या सेवाभावी संस्था खारीचा वाटा उचलताना दिसत आहेत. त्याचाच भाग म्हणून सेंटरने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार सेंटरने 8 वर्षात राज्यातील २, हजार ५०० हून अधिक गावांमध्ये पोहोचण्याचा उद्दिष्ट ठेवला आहे. त्यानुसार 8 वर्षात सुमारे ९० हजार ते ९५ हजार महिलांची मेमोग्राफी चाचण्या करण्यात येणार आहेत. तर १ लाख ३० हजार ते १ लाख ५० हजारपेक्षा जास्त पॅप स्मिअर चाचण्या केल्या जाणार आहेत.
तसेच, गर्भाशय कर्करोगाच्या 3 लाख चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच महिलांमध्ये आढळून येणाऱ्या या कर्करोगाच्या चाचण्या विनामुल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ओन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक सचिन देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, दुर्गम भागात राहणाऱ्या महिला वेळेवर आमच्यापर्यंत पोहोचत नसल्याने आजार बळावतो. म्हणून आम्ही प्रत्येक गावखेड्यात मेमोग्राफी व्हॅनद्वारे महिलांची कर्करोग चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्करोगाची सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. या मोहिमेद्वारे आम्ही २ हजार ५०० पेक्षा जास्त गावांमध्ये जाऊन ९० हजार ते ९५ हजार महिलांची मेमोग्राफी चाचण्या करणार आहोत. शिवाय १ लाख ३० हजार ते १ लाख ५० पेक्षा जास्त पॅप-स्मिअर आणि 3 लाख गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करणार आहोत. तर सध्या या उपक्रमासाठी विविध माध्यमातून निधी उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.