औरंगाबाद - पैशाच्या देवाण घेवाणीतून वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार आज समोर आला. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा मृतदेह चाटे शाळेच्या मागे असलेल्या विहिरीत पोत्यात सापडला. मुजीब अहमद खान (वय 59 वर्षे रा. शहा नगर, बीड बायपास, औरंगाबाद) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते एस.टी महामंडळातून सेवा निवृत्त होणार होते. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मृत खान हे एस.टी. महामंडळामध्ये नोकरीस आहेत. ते निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने गुरुवारी ते क्रांतिचौक येथील कार्यालयात निवृत्तीनंतर लागणाऱ्या कागदपत्रांची आणि प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी आलेच नाही. याबाबत नातेवाईकांनी बेपत्ता असल्याची तक्रार क्रांतिचौक पोलीस ठाण्यात दिली होती. त्यासह त्यांचा अपहरण झाल्याचा संशय देखील नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी या प्रकरणाच्या खोलात जाऊन माहिती मिळवली असता मृत खान यांचा 8 लाख रुपयांचा आर्थिक वाद असल्याचे समोर आले.
शिंदे यांच्या पथकाने संशयावरून आतिक व आसिफ या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना विचारपूस केली असता दोघांनीही पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आज सकाळी पुन्हा दोघांकडे विचारणा करण्यात आली असता दोघांची उत्तरे वेगवेगळी असल्याने पोलिसांना संशय आला. दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी खान यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच, खान यांचा मृतदेह सातारा परिसरातील चाटे शाळेच्या मागे असलेल्या विहिरीत पोत्यात बांधून फेकल्याची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहितीची शहानिशा केली असता एका पोत्यात खान यांचा मुंडके नसलेला मृतदेह पोलिसांना दिसून आला. मुंडाक्याचा शोध घेत असताना झालटा फाटा येथे त्यांचे मुंडके सापडून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान आणि दोन्ही आरोपींमध्ये 8 लाख रुपयांचा नेमका कोणता व्यवहार होता हे समोर आले नाही. दोन्ही आरोपींनी हत्या कुठे केली, कोठून खान यांचे अपहरण करण्यात आले. हत्याकांडात अजून किती आरोपींचा समावेश आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती क्रांतिचौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
लॉकडाऊनमध्ये दुसरा खून
कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे, प्रशासनाच्या वतीने 10 जुलै पासून शहरात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. तरी सुद्धा गुन्हेगारांनी डोके वर करत, खुनासारख्या घटना घडत आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच शुक्रवारी वाळूज इथल्या वडगावकोल्हाटी येथे तरुणाची हत्या करण्यात आली होती त्यानंतर लॉकडाऊनमध्ये दुसरी खुनाची घटना घडली आहे. कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी, शहरातील 80% पोलीस दल रस्त्यावर आहे. तरी सुद्धा खुनासारख्या घटना शहरात घडत आहे.