नवी मुंबई - नवी मुंबईतील पाच खासगी रुग्णालयांना मेस्मा अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर नवी मुंबईतील नागरिकांच्या चिंतेत भर टाकत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे नवी मुंबईतील खाजगी रुग्णालय बंद आहेत. यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. या बंद रुग्णालयांमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील या बंद असलेल्या खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाईचा बडगा पालिकेने उगारला आहे.
या अनुषंगाने नवी मुंबईतील पाच रुग्णालयांना पालिकेच्या माध्यमातून नोटीस देण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अनेक रुग्णालय बंद असल्याने अशा रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे वाशी येथील विजया मॅटर्निटी होम, कोपरखैरणे येथील डॉ. देठे रुग्णालय, सीबीडी बेलापूरमधील सुखदा रुग्णालय, नेरूळमधील डुप्लेक्स श्री दत्त मोहिनी रुग्णालय, ऐरोली मधील जास्मिन रूग्णालय या पाच रुग्णालयांना मेस्मा कायद्याअंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार या रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्याचा इशाराही आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्याने खासगी रूग्णालयांचे धाबे दणाणले आहेत.