नागपूर - शहरातील ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचे आजही (मंगळवारी) मनपाच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे.
महत्वाचे म्हणजे लसींचा साठा उपलब्ध नसल्याने गेल्या चार दिवसांपासून लसीकरण ठप्प झाले आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध न झाल्यामुळे लसीकरण होणार नसले तरी लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यलय व रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिल्या जाईल, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
लसीअभावी आजही नागपुरातील बहुतांश लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ज्यांनी वेळ काढून लस घेण्याची तयारी केली होती त्यांना लस येण्याची वाट बघावी लागणार आहे. आजही लसीकरण होणार नसल्याची माहिती ज्यांना मिळाली नाही, त्यांना केंद्रावर येऊन परत जावे लागत आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे १८ वर्षांवरील व्यक्तींना देण्यासाठी सहा हजार डोस आले होते. दोन दिवसात यातील २ हजार डोस संपले. आता केवळ चार हजार डोस शिल्लक आहेत. १८ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थ्यांना द्यावयाचे आहेत. साठा संपल्याने रविवारी शहरातील १८९ केंद्रांपैकी १५९ केंद्रांवरील लसीकरण ठप्प होते. त्यामुळे सोमवारी शहरातील लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.
नागपूर शहरात १८९ लसीकरण केंद्र सुरू असून, त्यात महापालिकेचे १०२ आणि शासकीय आणि खासगी ८७ केंद्र आहेत. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली सूतिकागृह व इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पिटल येथे १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे.
18 वर्षे वयोगटात 19 लाख लाभार्थी -
नागपूर शहर आणि जिल्ह्यात 18 वर्षे वयोगटात 19 लाख नागरिक आहेत. या सर्वांचे लसीकरण टप्या-टप्यात करावे लागणार आहे. त्यासाठी लाखो डोस लागणार आहेत. मात्र, सध्या निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेता राज्य सरकारला त्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील नागरिकांचा दुसरा डोस देखील सुरू झाल्याने लसीकरण मोहिमेची गती मंदावण्याची शक्यता आहे.