उरण (रायगड) - तालुक्यातील जनतेला कोरोनाचा सामना करावा लागत आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही त्याची झळ बसत आहे. येथील वृत्तपत्र विक्रेते लक्ष्मण ससाणे यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले आहे. यानंतर तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते येत्या १ मेपासून वृत्तपत्र विक्री काही दिवस बंद ठेवणार असल्याचे वृत्त विक्रेत्यांनी सांगितले.
वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण -
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून त्याची झळ अनेकांना बसत आहे. जीवावर उदार होऊन वृत्त संकलन करणारे पत्रकार व ते वाचकापर्यंत पोहचविण्याचे काम करणारे विक्रेते यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार अतुल पाटील यांचा तर मंगळवारी बोकडविरा येथील वृत्तपत्र विक्रेते लक्ष्मण ससाणे यांचा कोरोनाने वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे.
वृत्तपत्रांची विक्री करून ते आपल्या कुटूंबाची उपजीविका करीत होते. कर्त्या पुरुषाच्या अचानक जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते यांनाही कोरोनाची बाधा होऊ लागल्याने त्यांच्यातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लक्ष्मण ससाणे यांचा कोरोनाने निधन झाल्याचे समजताच तपासणी केली असता, आणखीन एका सहकार्याला बाधा होऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यामुळे उरणमधील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वृत्तपत्र विक्रीवर परिणाम -
गेल्यावर्षी पासून कोरोनाचे संकट आल्याने त्याचा विपरीत परिणाम वृत्तपत्र विक्रीवर मोठ्याप्रमाणात जाणवून खप कमी झाल्याने व्यवसाय ही डबघाईला आला आहे. त्यात आपल्या सहकारी वृत्तपत्र विक्रेत्यांना कोरोनाची बाधा होऊ लागल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांनी कोरोनाच्या भितीपोटी येत्या १ मे पासून काही दिवस वृत्तपत्र विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्तपत्र विक्रेत्यांनी सांगितले.