ठाणे : येथील कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या २४ तासात नव्याने ३८१ रुग्ण आढळून आल्याने महापालिका क्षेत्रात एकूण रुग्णसंख्या ९ हजार ८८० वर पोहोचली आहे. तर, गेल्या २४ तासात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजही कोरोना रुग्णाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले. तर, आतापर्यंत १५१ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५ हजार २९२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज आढळून आलेल्या रुग्णांची विगतवारी पाहता सर्वाधिक रुग्णांची संख्या डोंबिवली पूर्व परिसरात १३१ रुग्ण तर कल्याण पूर्वेत ६३ आणि कल्याण पश्चिममध्ये ११९ तर डोंबिवली पश्चिमेत ५२ आणि टिटवाळा - मांडा परिसरात ४ व मोहने गावात १२ असे एकूण एकाच दिवशी ३८१ रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णांच्या संख्येत २६ दिवसात झपाट्याने वाढ झाल्याचे रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. १२ जून ते १९ जून या आठ दिवसाच्या कालावधीत १ हजार ३१५ रुग्णांची वाढ, तर २० जून ते २७ जूनपर्यंत या दिवसात २ हजार २९८ रुग्णांची नोंद, २८ जून ते ५ जुलैपर्यत या आठ दिवसात तब्बल ३ हजार ७७७ रुग्णांची भर तर, ६ जुलैला ४१३ आणि आज ७ जुलै, ३८१ रुग्णांची भर असे केवळ २६ दिवसातच ८ हजार १८४ रुग्ण आढळून आल्याचे कल्याण डोंबिवली महापालिकाच्या आकडेवारी समोर आले आहे.