ठाणे - नवीन घर बांधण्याच्या कामासाठी आणलेल्या बिहारी मजुरांचे कान भरून त्यांना त्रास देतो, या संशयातून काकाने साथीदारांच्या मदतीने घरात शिरून पुतण्याला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना भिवंडी तालुक्यातील लाप बुद्रुक येथे घडली आहे. विश्वास गजानन पाटील (३८) असे जखमी झालेल्या पुतण्याचे नाव आहे.
तोंडाला मास्क न लावता गावात सर्रास फिरत होते मजूर -
विश्वास यांचे चुलत काका सध्या तालुक्यातील अंनगांव येथे कुटुंबासह राहत आहेत. त्यांनी त्यांचे मुळगांव लाप बुद्रुक येथे नवीन घर बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी बिहारी मजूर कामासाठी आणले आहेत. मात्र, ते कामावरून सुट्टी झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क न लावता गावात बीनबोभाट फिरत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी त्यांना हटकले व मास्क लावण्याचा सल्ला दिला. त्याची माहिती काका गुरुनाथ परशुराम पाटील यांना मिळताच त्यांनी शरद पाटील यास मोबाईलवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन चारचाकी गाड्यांमधून सहकाऱ्यांसह लाप बुद्रुक या मुळगावी जाऊन विश्वास पाटील हे घरात झोपलेले असताना गुरुनाथ पाटील, गीता पाटील, प्रज्ञा पाटील, देवानंद पाटील, नयन पाटील, अनिकेत पाटील या सहा जणांनी संगनमताने लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल नाही -
या मारहाणीत अनिकेत याने हातातील धातूच्या कड्याने डोक्याच्या उजव्या बाजूला प्रहार करून तर अन्य सहकाऱ्यांनी लाठ्या काठ्या व ठोश्या बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये देवानंद, नयन, अनिकेत या तिघांवरच फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तर मुख्य सूत्रधार गुरुनाथ पाटील याच्यासह दोघांवर फौजदारी कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड व अंबाडी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी दिलीप गोडबोले यांच्याकडे जखमी पुतण्याने लेखी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.