नागपूर - उपराजधानी नागपुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आलेला आहे. अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. मात्र आता आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली असून केंद्र शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच यासाठी स्वतःही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सप्टेंबर महिन्यात नागपूरातील मृत्यू दर वाढला होता. सध्या तो कमी होत आहे. मात्र तरीही ही चिंतेची बाब आहे. या मृत्यूदर वाढीचा आढावा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला आहे.हैद्राबाद हाऊस येथे झालेल्या बैठकीत त्यांनी विदर्भाच्या आरोग्य यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या मेयो, मेडिकल व एम्स यंत्रणेला बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडे एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.शासकीय आणि खासगी रुग्णालयात रुग्णांवर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे,मात्र सध्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यासोबतच सर्व धर्मदाय इस्पितळाना कोविड उपचार यंत्रणेमध्ये सक्रिय करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील मृत्युदर वाढची कारणे त्यांनी जाणून घेतली, अशावेळी धर्मदाय रुग्णालयांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करीत, गेल्या सहा महिन्यात कोरोना संदर्भात या रुग्णालयांनी गरीबांच्या सेवेसाठी काय ल केले या बद्दलचा अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले.
तसेच, यापूर्वी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निर्देशांची कुठपर्यंत पूर्तता झाली. त्याबाबतचा आढावा घेतला. नागपूरमध्ये सर्वसामान्य माणसाला आरोग्य यंत्रणेने बाबतची अद्ययावत माहिती नाही, असे होता कामा नये. यासाठी सामान्यातल्या सामान्य माणसाला शासकीय व खाजगी हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता सहज माहिती पडेल, अशी यंत्रणा लोकाभिमुख करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.