नागपूर - नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग काळात संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. यासोबतच लॉकडाऊनमध्ये अन्नधान्य पुरवठा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, गृह अलगीकरण, मायक्रो झोन निर्मिती, कॉल सेंटरची संपर्क व्यवस्था, आदी. बाबींची काळजी घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश प्रशासनाला दिले.
नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या ७ लाख ६१४ शिधापत्रिकाधारक आहेत. जिल्ह्यात तेराशे स्वस्त धान्य दुकाने आहेत. अंत्योदयमध्ये ७७ हजार ७८ पत्रिका धारकांचा समावेश आहे. प्राधान्य धारकामध्ये ३ लाख १५ हजार ८२ पत्रिका धारकांचा समावेश आहे. या सर्वांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मोफत वाटप करणे आवश्यक आहे. पण पॉज मशीनने संसर्ग वाढत असल्याने धोका निर्माण झाला असल्याने रेशन दुकानदाराना पॉज मशीनची अट शिथिल करावी, तसेच त्यांना विम्याचे कवच द्यावे, अशी मागणी केली आहे. या संदर्भात काय उपाययोजना करता येईल, याबाबत प्रशासनाने तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
एफसीआयमधून अद्याप धान्याची उचल व्हायची आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये वितरण सुरू होण्यापूर्वी सर्व समस्या निकाली काढण्याचे त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निर्देशित केले.
यावेळी पालकमंत्र्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण संदर्भातही आढावा घेतला. तीन केंद्रांवर लसीकरण सुरू होऊ शकेल. पण पुढील नियोजन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना सांगण्यात आले आहे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी प्रशासनाने नियोजन करावे. कामठी येथे खापरखेडा येथील प्लांट स्थानांतरित होत आहे. त्यामुळे लागणाऱ्या पायाभूत सुविधा पुरवण्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
होम आयसोलेशन, मायक्रो झोनमधील रुग्णांच्या सातत्याचा संपर्कात असणे आवश्यक आहे. मुंबई मनपाने रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी विशेष व्यवस्था उभारली. ती व्यवस्था नागपूरमध्ये उपयोगात येईल का? याची चाचपणी करण्याचेही सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे. मात्र, त्यातून नागरिकांचे समाधान होणे गरजेचे आहे, असेही सांगण्यात येत आहे.
नागपूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीमध्ये विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. हे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना सूचना देऊन ज्या क्षेत्रामध्ये सामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्याकडे लक्ष देणारी यंत्रणा अधिक गतिशील करण्याचे निर्देश त्यांनी दिले.