मुंबई - कोरोनापासून बचाव करण्यासाठी एन 95 मास्कचा वापर केला जातो. त्यानुसार केंद्र सरकारने याच्या किमती निश्चित केल्या आहेत. तरी देखील चढ्या किमतीत या मस्कची विक्री होत आहे. साकीनाका येथील झेरॉक्सच्या दुकानात अशाप्रकारे एन 95 मास्कची विक्री करणाऱ्या दुकानदाराला अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) दणका दिला आहे. दुकानदाराला अटक करत एफडीएने त्याच्याकडील 4 लाख 50 हजाराचा मास्कचा साठा जप्त केला आहे.
शिवजीभाई खेताभाई बरवाडिया असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर प्रकाराबाबत एफडीएला माहिती मिळाली होती. त्यावरून एफडीएने साकीनाका येथील बाबूजी झेरॉक्स येथे काल (29 जून) छापा टाकला. यावेळी एन 95 मास्कचा मोठा साठा आढळून आला, तर विविध ब्रँडच्या मस्कची विक्री चढ्या किमतीत केली जात असल्याचेही समोर आले. त्यानुसार एफडीएने हा साठा जप्त करत दुकानदाराला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.