मुंबई- मुंबई महानगर पालिकेने गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी याआधीच 15 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन हैदराबादमधील हेट्रो कंपनीकडून खरेदी केले आहेत. पण सध्या या इंजेक्शनचा तुडवडा आहे. पुरवठा कमी आहे, तर रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका रुग्णालयात या इंजेक्शनचा येत्या काळात तुडवडा भासू नये यासाठी आणखी 15 हजार इंजेक्शन खरेदी केले जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
गंभीर रुग्णांवर रेमडेसिवीर हे स्वाईन फ्ल्यूवरील इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. त्यामुळे आता डॉक्टरांकडून या इंजेक्शनचा वापर वाढला आहे. एकूणच इंजेक्शनची मागणी वाढली आहे. पण त्या तुलनेत पुरवठा नसल्याने मुंबईच नव्हे तर देशभर रेमडेसिवीरचा तुडवडा आहे. खासगी रुग्णालयात याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करत दामदुप्पटीने इंजेक्शन विकत असल्याचाही आरोप होत आहे.
दरम्यान, पालिकेने याआधीच निविदा काढत हैदराबादमधील हेट्रो कंपनीकडून 15 हजार इंजेक्शन खरेदी केले आहेत. 5 हजार 400 रुपयांचे इंजेक्शन 4 हजार 144 रुपयात पालिकेला मिळाले आहे, तर या 15 हजारांपैकी काही इंजेक्शन पालिकेला पहिल्या टप्प्यात मिळाले असून उर्वरित साठा लवकरच मिळणार आहे. मिळालेल्या इंजेक्शनचा वापर सुरू झाला आहे, असे काकाणी यांनी सांगितले.
पण रुग्णांची संख्या लक्षात घेता इंजेक्शन मोठ्या संख्येने लागणार आहेत. उत्पादन कमी असल्याने पुढे अडचणी येऊ नयेत यासाठी आता आणखी 15 हजार इंजेक्शन खरेदी केले जाणार आहेत, असे काकाणी यांनी सांगितले असून यासाठीची प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे.