हैदराबाद - आयपीएलच्या १२ व्या मौसमातील अंतिम सामना आज रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हैदराबाद येथे होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघानी प्रत्येकी ३ वेळा किताब जिंकला आहे. दोन्ही संघात प्रत्येकी ३ खेळाडू असे आहेत जे कोणत्याही क्षणी सामन्याचे पारडे बदलू शकतात.
आयपीएल २०१९ मध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा, डी कॉक आणि सूर्यकुमार यादव हे फलंदाज आहेत. दमदार कामगिरी करत हे खेळाडू कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतात. रोहित यंदाच्या सीजनमध्ये चांगला खेळला नसला तरीही त्याची बॅट कधीही तळपू शकते. डी कॉकने यंदा ५०० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. सूर्यकुमार यादवने क्वॉलिफायरमध्ये चेन्नईला घाम आणला होता आणि सामना मुंबईला जिंकून दिला होता.
आठव्यांदा आयपीएलचा सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जजवळ एकापेक्ष एक खतरनाक खेळाडू आहेत. शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस आणि कर्णधार एम.एस धोनी हे खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. वॉटसनने यंदा एकच शतकी खेळी केली आहे. त्यानंतर त्याची बॅट शांतच राहिली आहे. डुप्लेसिस वेगाने धावा काढण्यात माहीर आहे. मागील सामन्यात त्याने अर्धशतक ठोकून चेन्नईला अंतिम फेरीत नेले. दुसरीकडे महेंद्रसिंह धोनी शेवटच्या षटकात धावा काढण्यात माहिर आहे. चेन्नईकडे महेंद्र सिंह धोनी हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे ही त्यांची जमेची बाजू आहे. मधलीफळी सांभाळून ते वेगाने धावा काढू शकतो.