नागपूर- रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले राज्यातील सुमारे 400 विद्यार्थी कोरोनाच्या संकटामुळे अडकून पडलेले होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार प्रकाश गजभिये यांनी दिली. या 400 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थी विदर्भातील विविध जिल्ह्यातील आहेत. वंदे भारत मिशन अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना भारतात आणले जाणार आहे.
अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रयत्न सुरू केले होते. यावेळी गजभिये यांनी देखील आपल्या स्तरावर प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांची कैफियत मांडली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून आता 17 जूनला सर्व विद्यार्थी मॉस्कोवरून नागपूरला परत येणार असल्याची माहिती गजभिये यांनी दिली.