मुंबई - मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर मंत्री अशोक चव्हाण आणि आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली हे अजून स्पष्ट झालेले नाही. संंबंधित वृत्ताला पहाटे पाच वाजता बीड जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिला आहे. मुंडे सध्या मुंबईत असून, रुग्णालयात उपचार घेत आहेत.
याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. मुंडे यांनी सोमवारी अंबाजोगाईत कोविड १९ प्रयोगशाळेचे उद्घाटन देखील केले होते. यावेळी अनेकजण उपस्थित होते. तसेच परळीत जगतकर गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह औरंगाबादेत 5 जून रोजी आढळून आली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात मुंडे देखील आले होते. मुंडे यांचा समावेश हाय-रिस्क गटात न करता लो-रिस्क गटात करण्यात आला होता. त्यामुळे यापूर्वी त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळले आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे असेही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटले.
जिल्हाधिकारी रेखावर यांचे आवाहन -
जे लोक मागील 4 दिवसांत पालकमंत्री धनंजय मुंडे, त्यांचे स्वीय सहायक किंवा त्यांचे निकटवर्तीय यांच्या संपर्कात आले असतील, किंवा त्यांच्याशी काही कागदपत्रांची देवाण-घेवाण केली असेल. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी पुढील 28 दिवस होम क्वारंटाईन व्हावे, कुणात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले आहे.