मुंबई- विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी केली. काही मर्यादित सदस्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन घेऊया, अशी मी विरोधी नेत्यांना विनंती केली होती. मात्र त्यांनी अधिवेशनाला उपस्थित राहणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे अशी भूमिका घेतली. कायदेशीर दृष्ट्या विरोधकांच बरोबर आहे. तसेच दोन्ही सभागृहातील सदस्यांची संख्या आणि त्यांच्याबरोबर असलेले पीए आणि इतर लोकांची व्यवस्था करणे थोडे कठीण असल्याने पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली.
पावसाळी अधिवेशन हे 7 सप्टेंबर रोजी होईल. आता ते किती दिवसांचे करायचे, कशा पद्धतीने करायचे हे ठरवण्यासाठी अधिवेशना आधी कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल. या बैठकीत अधिवेशनाचे दिवस, कोणते विषय घेतले जातील, याचा निर्णय होईल असे अनिल परब यांनी सांगितले.
तसेच, मराठा आरक्षणाचा विषय हा न्यायप्रविष्ट आहे. या संदर्भातील सूचना मुख्यमंत्र्यांकडे करण्यात याव्या. आरक्षण टिकाव ही सरकारची इच्छा आहे. त्याला कुठे वेड वाकड वळण लागणार नाही याची काळजी सरकार म्हणून आम्हाला घ्यायची आहे, अशी प्रतिक्रिया देखील परब यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दिली.