गडचिरोली - दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी लागणाऱ्या ई - पासकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी एका वाहन चालकाकडून १ हजार रुपयांची लाच घेताना चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रंगेहाथ पकडले आहे. डॉ. मनोज पेंदाम असे लाच घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तक्रार करणारा वाहनचालक हा चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपूर येथील रहिवासी असून त्याला चंद्रपूरला जाण्याकरिता ई -पास काढावा लागणार होता. परंतू त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज होती. हे प्रमाणपत्र प्राप्त् करण्यासाठी त्याने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पेंदाम याच्याशी संपर्क साधला होता. परंतू पेंदाम याने तक्रारकर्त्याला १ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत वाहनचालकाने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सापळा रचत डॉ. पेंदाम याला तक्रारदाराकडून १ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गडचिरोलीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, हवालदार नत्थू धोटे, सहायक पोलीस नाईक सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, पोलीस शिपाई महेश कुकुडकर यांनी केली.
दरम्यान, एसीबीने मागील २० दिवसांत केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. मे महिन्याच्या अखेरीस वडसा आणि कोरची येथील दोन वन परिक्षेत्राधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. त्यानंतर पाच दिवसांपूर्वीच पोटेगाव पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक आणि हवालदारही लाच घेताना पकडले गेले. मंगळवारी चक्क वैद्यकीय अधिकारी लाच स्वीकारताना आढळून आला.