मुंबई - देशाचा गुन्हे दर वाढत असताना महाराष्ट्राचा गुन्हे दर मात्र 2018-19 च्या तुलनेत स्थिर राहिला असून या यादीत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक गुन्हे दर केरळ, तेलंगाणा, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांचा आहे. तसेच महाराष्ट्राचा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दर हा वाढला असून यावर्षी 49 टक्क्यांवर पोहोचला आहे. 2018 मध्ये हाच दर 41.41 टक्के होता. दरवाढ होण्यात महाराष्ट्राचा 11वा क्रमांक लागतो. तर कर्नाटकचा दर 36.6, मध्यप्रदेश 47.00, गुजरात 45.6, तेलंगाणाचा 42.5 टक्के दर आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
2019 मध्ये देशात हिंसाचाराच्या एकूण 4.17 लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तर राज्यात 2019 मध्ये हिंसाचाराचा गुन्हे दर केवळ 36 होता आणि राज्य 11 व्या क्रमांकावर होते. 2019 मध्ये देशाचा खूनासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये गुन्हे दर 2.2 असा होता. त्यात महाराष्ट्राचा गुन्हे दर केवळ 1.7 असून महाराष्ट्र राज्य हे 25 व्या क्रमांकावर होते. तर खुनाचा प्रयत्न संदर्भातील गुन्ह्यांबाबत महाराष्ट्राचा 17वा क्रमांक आहे.
स्त्रियांवरील अत्याचार गुन्हे -
इतर राज्यांच्या तुलनेत प्रती लक्ष महिला लोकसंख्यामागे महाराष्ट्र राज्य 13व्या क्रमांकावर आहे. सन 2019 मध्ये बलात्काराचे राजस्थानमध्ये 5997, उत्तरप्रदेश 3065, मध्यप्रदेश 2485, आणि महाराष्ट्रमध्ये 2299 असे गुन्हे नोंदविले आहेत. या 2299 गुन्हेगारांपैकी 2274 गुन्हेगार हे परिचित, नातेवाईक, मित्र, शेजारी असे ओळखीचे आहेत तर केवळ 25 गुन्हेगार अनोळखी आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर 3.09 असुन महाराष्ट्र 22व्या क्रमांकावर आहे. तर केरळ राज्याचा 11.6, हिमाचल प्रदेश 10, हरियाणा 10.9, झारखंड 7.7, मध्यप्रदेशचा 6.2 टक्के आहे.
भा.दं.वि.चे गुन्हे -
संपूर्ण देशात 2019 मध्ये भा.दं.वि.चे 32.25 लाख गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर 278.4 असून महाराष्ट्र राज्य 8व्या क्रमांकावर (प्रतिलाख लोकसंख्येनुसार) आहे. यात मध्यप्रदेश, हरियाणा, केरळ, राजस्थान, तेलंगाणा यांचा दर जास्त आहे तर उत्तरप्रदेश हे राज्य भा.दं.वि.च्या गुन्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आर्म्स ॲक्ट अंतर्गत अवैध हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात महाराष्ट्राचा 9वा क्रमांक आहे. यात महाराष्ट्रात केवळ 910 गुन्ह्याची नोंद आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये 25,524, मध्यप्रदेश 3847, बिहार 2976 आणि राजस्थानमध्ये 2095 गुन्हे नोंद आहेत. एकूणच ही आकडेवारी पाहता महाराष्ट्र राज्य गुन्हेगारी रोखण्यामध्ये निश्चितच यशस्वी झाले आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.