ठाणे- कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने केवळ 20 दिवसांतच 5 हजारचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून आजपासून 12 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली असून शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.
लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पहिल्याच दिवशी नियम मोडणाऱ्या शेकडो दुचाकी चालकांच्या चाव्या पोलिसांनी जप्त केल्या, तर काही दुचाक्या, चारचाक्या, रिक्षांच्या टायरची हवाही काढली आहे. तसेच, कल्याण डोंबिवली शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सगळ्या प्रकाराची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मेडिकल स्टोअर, दूध डेअरीत ग्राहक अत्यंत तुरळक प्रमाणात दिसून आले. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांच्या विरोधात पोलीस गुन्हे दाखल करणार आहेत, असे पोलिसांकडून रिक्षा फिरवून आवाहन केले जात आहे.
दुचाकीवरून डबलसीट प्रवास करणाऱ्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. शहराच्या एन्ट्री पॉईंटवरील नाकाबंदीसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी शहराबाहेरील गाड्यांना प्रवेश नाकारल्याने शिळ फाटा, दुर्गाडी पुलावरून काही वाहने परत पिटाळून लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते पुन्हा बांबू बांधून सील करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. काही ठिकाणी राज्य राखीव पोलीस तैनात आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. लॉकडाऊन हा कोरोना रोखण्यासाठी करण्यात आला आहे. विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी केले आहे.
सभापतींची उद्घोषणा
कल्याण डोंबिवली महापलिकेतील स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी आज डोंबिवली पश्चिम परिसरात स्वत: माईक घेऊन नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. कोरोनावर मात करून शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाने केलेला लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वी करण्यास नागरिकांनी साथ दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले.