अहमदनगर - जाळीवरून उडी मारून बिबट्याने शेळीवर हल्ला केला. यात शेळी जागीच ठार झाली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा परिसरातील गणपीरदरा येथे शनिवारी (10 एप्रिल) पहाटे दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दहा ते बारा फूट उंच असलेल्या जाळीवरून उडी मारून बिबट्याने हा हल्ला केला.
लोक बाहेर येताच बिबट्या पसार
याबाबतची अधिक माहिती अशी, की आंबीखालसा परिसरातील गणपीरदरा येथील शेतकरी नौशाद महेमूद पटेल यांच्या घरापासून काही अंतरावरच कोंबड्यांची शेड आहे. सध्या कोंबड्या नसल्याने त्यांनी या शेडमध्ये शेळ्या, गायी बांधल्या होत्या. दरम्यान, शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने जाळीवरून उडी मारून थेट आतमध्ये प्रवेश करत शेळीवर हल्ला केला. शेळी ओरडण्याचा आवाज आल्याने घरातील लोक झोपेतून जागे होवून बाहेर आले. यानंतर बिबट्याने पुन्हा शेडमधून बाहेर उडी मारत धूम ठोकली. सकाळी या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून मृत शेळीचा पंचनामा केला.