दिंडोरी (नाशिक)- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत जानोरीतून विमानतळामध्ये पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र ज्या पाईपलाईनमधून पाणी पुरवठा सुरू आहे, त्या पाईपलाईनला गेल्या 6 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून गळती लागली आहे. ही गळती निदर्शनास आणून देवूनही संबंधित विभाग विमानतळाकडे बोट दाखवत, तर विमानतळ प्रशासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवत आहे. या टोलवाटोलवीत मात्र लाखो लिटर पाणी रोज वाया जात आहे.
4 इंचीच्या पाईपलाईनमधून जवळपास 2 इंच पाण्याची गळती सुरू असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. असे असताना याकडे मात्र प्रशासन सपशेल दुर्लक्ष करत आहे. दारूडे या लिकेजजवळ येवून दारू पित असून तळीरामांचा हा अड्डा बनलेला आहे. शेतकऱ्यांच्या बांधाजवळ असणाऱ्या व्हॉल्व्हजवळ लिकेज वाढले तर शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची धमकी दिली जाते. मग हे लाखो लिटर पाणी वाया जात असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का गप्प आहे, असा सवाल जानोरी येथील ग्रामस्थ शरद घुमरे व शरद काठे यांनी केला आहे. व पाईपलाईनची गळती त्वरीत थांबविण्याची मागणी केली आहे.