लंडन - श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची मेरिलिबोन क्रिकेट क्लबचा पहिला बिगर ब्रिटिश अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एमसीसीचे विद्यमान अध्यक्ष अंथनी रेफोर्ड यांनी संगकाराचे नाव सुचवले आहे. संगकार ऑक्टोबर २०१९ मध्ये या पदाची धुरा स्वीकारणार आहे. त्याचा कार्यकाल एक वर्षाचा असेल. संगकारा हा एमसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणारा २३३ वर्षाच्या इतिहासातील पहिलाच बिगर ब्रिटिश व्यक्ती आहे.
यापूर्वी ४१ वर्षीय संगकाराला एमसीसीचा आजीवन मानद सदस्य बनविण्यात आले होते. एमसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संगकाराने आनंद व्यक्त केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, एमसीसीचा अध्यक्ष होणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.
संगकारा पुढे बोलातना म्हणाला, माझ्यासाठी एमसीसी जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेट क्लब आहे. हा क्लब क्रिकेट बाहेरही चांगली कामगिरी करत आहे. मी अध्यक्ष म्हणून कार्य करण्यासाठी उत्सुक आहे. एमसीसीची १७८७ साली स्थापना झाली. त्यात आतापर्यंत १६८ अध्यक्ष झाले आहेत.