मुंबई - विश्वचषकासाठी पाहुण्या इंग्लंडने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पण हा संघ अंतिम नाही. संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गन याच्या खांद्यावर देण्यात आले आहे. यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर याला उप-कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे. पण या संघात आयपीएलमध्ये धमाका करणाऱ्या आणि मूळचा विंडीजचा असलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला संघात स्थान देण्यात आलेले नाही.
जोफ्रा आर्चर याला आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यासोबत होणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. तो सध्या राजस्थान संघाकडून खेळताना आयपीएलमध्ये धमाका करत आहे. त्याने आयपीएलच्या ८ सामन्यात १० गडी बाद केले आहेत.
निवड समितीचे प्रमुख स्मिथ म्हणाले की, स्थानिक सामन्यात आणि लीग सामन्यात जोफ्राने चांगली कामगिरी केली आहे. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. तो विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवू शकतो. २३ मे पर्यंत त्याला दमदार कामगिरी करुन दाखवावी लागेल.
अष्टपैलू ख्रिस वोक्सच्या मते, आर्चर यास विश्वचषकाच्या संघात स्थान द्यायला हवे होते. आर्चरने टी-२० मध्ये चाहत्यांना त्याच्या कामगिरीने खूपच प्रभावित केले आहे. तो फक्त १४ एकदिवसीय सामने खेळला आहे.