नवी दिल्ली - जासिया अख्तर ही महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेत खेळणारी जम्मू काश्मीरची पहिली महिला क्रिकेटर झाली आहे. शोपियां जिल्ह्यातील रहिवासी असलेली अख्तर ही पंजाबच्या संघातून खेळते. याचसोबत आता ती महिला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे.
या निवडीबाबत जासिया म्हणाली, की २४ एप्रिलला मला बीसीसीआयकडून फोन आला. यात २ मे रोजी मला संघात सहभागी होण्याविषयी सांगितले. संघात निवड होणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचेही तिने सांगितले.
जासिया ट्रेल ब्लाजर्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या संघाचे नेतृत्व स्मृथी मंधानाकडे आहे. या निवडीबद्दल जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी जासिया हिला ट्वीटवर शुभेच्छा दिल्या.
महिला टी-२० चॅलेंज स्पर्धो ६ मे ते ११ मे दरम्यान होणार आहे. यात ३ संघांचा सहभाग असणार आहे. ६, ८ आणि ९ तारखेला हे सामने होतील. या मालिकेतील अतिंम सामना ११ मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. या सर्व सामन्याचे प्रसारण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे.