नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कोरोनाची स्थिती गंभीर होत असतानाच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दल दिल्लीकरांच्या मदतीला धावून आले आहे. दिल्लीतील छत्तरपूर भागात आयटीबीपीकडून 10 हजार खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. राधा स्वामी बिआस सत्संग सेंटर येथे हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.
आयटीबीपी आणि दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कोविड सेंटरची पाहणी केली. दोघे मिळून हे सेंटर चालवणार आहेत. आयटीबीपीद्वारे हे कोरोनाग्रस्तांसाठी कोव्हिड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे काल ( मंगळवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते. दिल्लीतील छत्तरपूर भागामध्ये हे सेंटर तयार करण्यात आले आहे.
दिल्ली सरकारच्या मागणीनुसार आयटीपीबी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी या केंद्रात उपलब्ध करून देणार आहेत. आयटीबीपीला केंद्रीय गृहमंत्रालयाने नोडल एजन्सी म्हणून नेमले आहे. 26 जूनपर्यंत या सेंटरमध्ये 2 हजार रुग्णांचे उपचार होऊ शकतात, असा अंदाज आहे. टप्प्या-टप्प्याने काम पुढे नेण्यात येत आहे. हे देशातील आणि दिल्लीतल सर्वात मोठे कोविड सेंटर आहे.