नवी दिल्ली - भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणवर जम्म-काश्मीर क्रिकेट बोर्डाने नवी जबाबदारी दिली आहे. मागील वर्षी इरफान पठाण हा जम्मू-काश्मीरच्या संघात खेळाडू म्हणून सहभागी झाला होता. या पुढे तो जम्मू-काश्मीरचा प्रशिक्षक आणि मेंटर म्हणून काम पाहणार आहे. बडोद्याचा रहिवासी असलेला पठाण पहिल्यांदाच प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळणारा रासिख सलाम हा काश्मिरी हिरा शोधून काढण्यात इरफान पठाणचा मोठा वाटा आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट संघटनेचे सीईओ आशिक भुखारी हे माहिती देताना म्हणाले की, इरफान पठाणला प्रशिक्षक आणि मेंटर म्हणून करारबद्ध करण्यात आले आहे. सध्या तो आयपीएलमध्ये व्यस्त आहे. आयपीएल झाल्यानंतर तो संघाशी जोडला जाईल.
जम्मू-काश्मीर संघातील खेळाडूंचा सल्ला घेऊनच इरफान पाठाणची निवड करण्यात आली आहे. मागील वर्षी तो संघाचा एक भाग होता. संघासाठी नवे खेळाडू शोधणे आणि विकास करणे, ही दुहेरी जबाबदारी त्याने पार पाडली.
इरफान पठाणने भारतासाठी शेवटचा सामना २०१२ मध्ये खेळला होता. त्याने भारताकडून २९ कसोटी सामने खेळले असून त्यात १०० बळी घेतले आहेत. सोबत १ हजार १०५ धावाही केल्या आहेत. त्यात ६ अर्धशतके आणि एका शतकाची नोंद आहे. तसेच १२० एकदिवसीय सामन्यात त्याने १ हजार ५४४ धावा केल्या आहेत. त्यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे. ८३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच गोलंदाजीत त्याच्या नावावर १७३ बळींची नोंद आहे.