कोलकाता - केकेआर संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्या नावावर एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये बंगळुरूविरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात कुलदीप यादवची बंगळुरूच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
कुलदीपने बंगळुरूविरुद्ध खेळताना ४ षटकात सर्वाधिक ५९ धावा दिल्या आहेत. याचसोबत आयपीएलमधील सर्वात महागडा गोलंदाज बनला आहे. तसेच कुलदीपने ५९ धावा देत कर्ण शर्माचा विक्रम मोडीत काढला. शर्माने २०१६ साली ५७ धावा दिल्या होत्या. इम्रान ताहिरनेही २०१६ साली दिल्लीकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात ५९ धावा दिल्या होत्या. एका फिरकी गोलंदाजाकडून दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. रवींद्र जाडेजानेही २०१७ साली ५९ धावा दिल्या होत्या.
मोईन अली आणि विराट कोहलीने कुलदीप यादवची गोलंदाजी फोडून काढली. १६ व्या षटकात मोईनने ४,६,४,६ वाईड,६ अशा एकूण २७ धावा काढल्या. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मोईन अलीचा बळी देखील कुलदीपला घेता आला. या निराशाजनक कामगिरीनंतर तो खूपच नाराज दिसून आला.
कुलदीप हा भारताच्या विश्वकरंडक संघातील प्रमुख खेळाडू आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला छाप सोडता आली नाही. त्याने ९ सामन्यात केवळ ४ गडी बाद करता आले.