नवी मुंबई- सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वे प्रवासासाठी क्युआर कोड ई पास देण्याची मागणी माथाडी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाशी रेल्वे स्थानकाजवळ धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सरकारने एपीएमसी मार्केट सुरू राहावे म्हणून आवाहन केले होते. त्यानुसार कोरोनाच्या काळात एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे एपीएमसीमधील माथाडी कामगार असणाऱ्या 15 ते 20 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचा जर मृत्य झाला तर त्यांना 50 हजारांचा विमा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रात मोडत नसलेल्या राज्यातील शासकीय संस्थाना विमा कवच जाहीर केले आहे. राज्य सरकारच्या सांगण्यावरून एपीएमसी मार्केट सुरू ठेवले होते. मुंबई तसेच ठाणे, नवी मुंबई परिसरात लोकांचे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून माथाडी कामगारांनी काम सुरूच ठेवले होते. त्यामुळे माथाडी कामगाराना अत्यावश्यक सेवेत सहभागी करून घेण्यात यावे, यासाठी माथाडी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध माथाडी बोर्डातील नोंदणीकृत कामगार हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवी मुंबईतील अन्न-धान्य, भाजी व फळे आणि मसाला मार्केट आवारात जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ- उताराची कामे करतात. या कामगारांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करा व त्यांना पश्चिम व हार्बर लाईनवरील रेल्वेने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून क्युआर कोड ई पास द्या, अशी मागणी आज माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली.