लाहोर - पाकिस्तानचा फलंदाज इम्रान फरहतने त्यांच्याच देशाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीवर गंभीर आरोप केले आहेत. आफ्रिदी एक स्वार्थी खेळाडू आहे. ज्याने अनेक खेळाडूंचे करिअर बरबाद केले असल्याचे इम्रान म्हणाला आहे.
आफ्रिदीने नुकतेच त्याची आत्मकथा 'गेम चेंजर' मध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्यात काश्मीर आणि २०१० साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाबाबत खुलासे करण्यात आले आहेत. त्याच सोबत जावेद मियाँदाद, वकार युनिस आणि गौतम गंभीरविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. मात्र, आता पाकिस्तानचा खेळाडू फरहतने आफ्रिदीवरच आरोपाची तोफ डागली आहे.
फरहत म्हणाला की, मी आफ्रिदीच्या पुस्तकाविषयी जे काही ऐकले किंवा वाचले ते पाहून मला लाज वाटत आहेत. तो एक असा खेळाडू आहे, ज्याने त्याचे वय जवळजवळ २० वर्ष लपवून ठेवले आणि काही दिग्गज खेळाडूंना दोष देत आहे.
पाकिस्तानकडून ४० कसोटी आणि ५८ एकदिवसीय सामने खेळणारा फरहत याने ट्वीट करत लिहिले की, माझ्या जवळ या तथाकथित संताच्या अनेक कहाण्या आहेत. ज्याच्यासोबत मला खेळण्याचे भाग्य लाभले आहे. त्याच्यात नेता बनण्याचे अनेक गुण आहेत. ज्यांच्याविषयी या पुस्तकात लिहिले गेले आहे. त्यांनी पुढे येऊन त्याच्याविषयी बोलले पाहिजे. लोकांना आफ्रिदी खरे काय आहे, हे कळू द्या? ज्याने अनेक खेळाडूंचे करियर बरबाद केले आहे.